The Climate Week India Blog — Climate Week India

क्लायमेट वीक इंडिया ब्लॉग

समुदायाच्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांची कालानुक्रमे नोंद.

जुलै २०२६: संसाधने, देवाण-घेवाण आणि वारसा

वाचण्यासाठी क्लिक करा

  • १३ जुलै रोजी संघटनेने सहयोगी दस्तऐवजाचं नाव बदलून बचावात्मक वाटणाऱ्या “MoU” ऐवजी “द कॉमन्स अ‍ॅग्रीमेंट” असं ठेवलं. हा एकच करार सर्व सहयोगी, अ‍ॅम्बेसेडर्स, स्वयंसेवक आणि अँकर्स यांच्यासाठी समान राहील.
  • जुलैच्या मध्यात “द कॉमन्स अ‍ॅग्रीमेंट” लागू झाले. जेफ्री यांनी त्याची प्राथमिक तयारी केली, तर क्रितका, आशीष, पियाली, वैष्णवी आणि जेकब यांनी त्याला अंतिम स्वरूप दिले. व्यक्ती किंवा संस्थेला सहभागी होता येण्याचे १७ वेगवेगळे मार्ग त्यामध्ये नमूद करण्यात आले.
  • यासोबतच “देणाऱ्याने देत जावे..” ही संकल्पना देखील सुरू झाली. सहयोगींनी सहयोगींसाठीच तयार केलेला हा एक सामायिक संसाधनांचं दालन आहे, जिथे कोणीही मदतीची मागणी किंवा मदत करण्याची तयारी दर्शवू शकते; मग ती नाशिकमध्ये कुणाला प्रोजेक्टर हवा असो वा इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील भाषांतर असो.
  • या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला: अल्ट एफ्फ (Alt EFF), हैय्या (Haiyya) आणि असर (Asar) या तीन संस्थांनी मिळून तब्बल २८ कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे वचन दिले. यामुळे २०२५ च्या तुलनेत सहयोगींची संख्या आता जवळपास दुप्पट होण्याचा अंदाज आहे.
  • क्लिष्ट शब्द सोपे करण्यासाठी एक मालिका तयार करण्यात आली. यात भारतातील विविध भाषांमधील हवामानाशी संबंधित कठीण शब्द सोप्या भाषेत समजावून सांगणाऱ्या १० सोशल मीडिया पोस्ट्सचा समावेश आहे. यात एक प्रामाणिक कबुलीही देण्यात आली आहे की, हे शब्द मुख्य सहयोगी, अँकर्स, सदिच्छादूत आणि स्वयंसेवकांनाही शिकावेच लागले होते; आणि आता स्वयंसेवकांना या पोस्ट्सचे भाषांतर करण्यासाठी आमंत्रित केले जात आहे.
  • आणि इथेच जबाबदारीचे हस्तांतरण सुरू झाले. २०२६ साठी, दिव्या अँकरच्या भूमिकेतून बाजूला होत आहे, आणि क्रितकाचाही या भूमिकेतील कार्यकाळ जुलैअखेरीस पूर्ण होत आहे. या संपूर्ण मॉडेलची निर्मितीच अशा प्रकारच्या आलटून-पालटून जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी करण्यात आली होती. इथल्या कार्यपद्धती अशा प्रकारे तयार केल्या गेल्या होत्या, जेणेकरून माणसे बदलली तरी काम अखंड सुरू राहील.
  • ऑक्टोबर २०२४ मध्ये UNFCCC कडून नाकारल्या गेलेल्या एका अर्जापासून सुरू झालेला हा प्रवास, आज एका अशा संघटनेपर्यंत पोहोचला आहे जिच्याकडून इतर देश आता मार्गदर्शक तत्त्वे मागवत आहेत. या संपूर्ण प्रवासात एकच सूत्र कायम राहिले: इथे कोणी एक बॉस नाही, हा मंच आपल्या सर्वांच्या सहभागातूनच साकारतो.

या पोस्टची लिंक कॉपी करा https://climateweek.in/mr/blog/#post-july-2026

जून २०२६: दरवाजे खुले झाले, आणि जगातून प्रतिसाद यायला सुरुवात झाली

वाचण्यासाठी क्लिक करा

  • जून महिन्यात क्लायमेट वीक इंडिया २०२६ अधिकृतपणे लोकांसमोर आले. कार्यक्रमाच्या तारखा निश्चित झाल्या, नवीन लोगो प्रसिद्ध झाला, नव्याने तयार केलेली वेबसाइट लाईव्ह झाली आणि एक्सप्रेशन ऑफ इन्टरेस्ट फॉर्म, पहिली कम्युनिटी ओपन हाऊस बैठक आणि दर आठवड्याला होणाऱ्या सहयोगींच्या बैठका पुन्हा सुरू करून सहभागाचे दरवाजे उघडण्यात आले. इतर देशांमधील क्लायमेट वीक्स देखील याकडे लक्ष देऊ लागले, आणि भारतातील तळागाळातील हा प्रयोग सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय बनू लागला.
  • नवीन सहयोगी आणि स्वयंसेवकांसाठी ‘उत्सुकता अभिव्यक्ती’ फॉर्म खुला करण्यात आला. वैष्णवी आणि क्रितका यांनी याचे हिंदीत; तर मयुरी, शुभांगी आणि रोशन यांच्या महाराष्ट्र टीमने मराठीत भाषांतर केले.
  • १९ कार्यक्रमांसाठी एकूण ६.६ लाख रुपयांच्या बजेटची मागणी करण्यात आली होती. यावेळी कोणीही निश्चित निधी देणारे किंवा प्रायोजक पाठीशी नव्हते, आणि या संघटनेने अशा परिस्थितीमध्ये काम करण्याची तयारी नेहमीच ठेवली होती.
  • संघटनेची बँकॉक क्लायमेट ॲक्शन वीकच्या संस्थापक टीमशी भेट झाली होती, जिथे दिव्याने बँकॉक मधील प्रत्यक्ष संवादांचे रेकॉर्डिंग केले. तसेच लंडन क्लायमेट ॲक्शन वीकच्या टीमशीही दोनदा संपर्क साधण्यात आला होता. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसला, तरी जेकब LCAW दरम्यान लंडनमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहणार होते.
  • १६ जून रोजी पहिली कम्युनिटी ओपन हाऊस बैठक पार पडली, ज्यामध्ये क्लायमेट वीक इंडिया कसे काम करते हे जाणून घेण्यासाठी सुमारे ४५ जण एकत्र आले होते.

या पोस्टची लिंक कॉपी करा https://climateweek.in/mr/blog/#post-june-2026

मे २०२६: नवीन टीम, नवे व्यासपीठ आणि अवघे चार महिने बाकी

वाचण्यासाठी क्लिक करा

  • ८ मे रोजी झालेल्या सुरुवातीच्या बैठकीसाठी २०२६ ची टीम एकत्र आली. यात जेकब आणि दिव्या यांच्यासोबत क्रितका, रोशन, मयुरी आणि शुभांगी सामील झाले. त्यांनी नेटवर्किंग, वेबसाइट, सोशल मीडिया, समुदाय व्यवस्थापन आणि सदिच्छादूत समन्वयाची जबाबदारी स्वीकारली.
  • महाराष्ट्रासाठी एक वेगळी टीम तयार करण्यात आली. ज्यामध्ये रोशन आणि शुभांगी यांनी ग्रामीण भागातील, तर मयुरीने शहरातील संपर्काची जबाबदारी सांभाळली. त्यांनी स्वच्छ पुणे (SWaCH Pune), पुणे रिव्हर रिव्हायव्हल आणि अर्थिंग स्टोअर्स सारख्या सहयोगींना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
  • कार्यक्रम नोंदणीसाठी टीमने लुमा (Luma) या प्लॅटफॉर्मचा प्रयोग सुरू केला.
  • नवीन सहयोगी आणि स्वयंसेवकांसाठी ‘उत्सुकता अभिव्यक्ती’ फॉर्म खुला करण्यात आला. वैष्णवी आणि क्रितका यांनी याचे हिंदीत; तर मयुरी, शुभांगी आणि रोशन यांच्या महाराष्ट्र टीमने मराठीत भाषांतर केले.
  • २०२६ चा लोगो तयार करण्याची प्रक्रिया जेकब यांनी सुरू केली.

या पोस्टची लिंक कॉपी करा https://climateweek.in/mr/blog/#post-may-2026

एप्रिल २०२६ : नव्या उभारणीपूर्वीचा शांत महिना

वाचण्यासाठी क्लिक करा

  • २०२६ च्या तारखा जवळपास निश्चित झाल्या होत्या आणि पहिलं पूर्ण चक्र पूर्ण झालं होतं. त्यामुळे एप्रिलमध्ये मोठ्या घोषणा करण्याऐवजी अँकर्सनी पुढील दिशेचा आढावा घेण्यावर भर दिला. २०२६ कसं असावं, २०२५ मधलं काय जपावं आणि काय नव्यानं उभारावं, यावर निर्णय घेण्याचं काम सुरू होतं.
  • या सर्व मंथनातून एक स्पष्ट दिशा समोर आली. जुन्या व्यासपीठाच्या मर्यादांशी तडजोड करत राहण्यापेक्षा नवीन प्लॅटफॉर्मवर वेबसाइटची पुनर्रचना केली जावी असे ठरले. हा २०२५ च्या अनुभवातून मिळालेला सर्वात मोठा व्यावहारिक धडा होता.

या पोस्टची लिंक कॉपी करा https://climateweek.in/mr/blog/#post-april-2026

मार्च २०२६ : पुढच्या वर्षाची तारीख आणि हा प्रवास कसा घडला याचं पुस्तक

वाचण्यासाठी क्लिक करा

  • संघटनेने क्लायमेट वीक इंडिया २०२६ ची तारीख निश्चित केली (२७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर). तसेच कोणत्याही एका प्रायोजकावर अवलंबून राहण्याऐवजी सर्वांनी एकत्र मिळून निधी उभारण्यास सुरुवात केली. यासोबतच स्वतःची कार्यपद्धती लिहून काढण्यास सुरुवात केली, जेणेकरून हे मॉडेल इतरांना सहज सोपवता येईल. काम करण्याची ही पद्धत पुन्हा पुन्हा वापरता येण्यासारखी आहे, ही पुस्तिका या गोष्टीचा दाखला देते. भारतातील तसेच जगातील इतर समुदायही आता याबद्दल विचारू लागले होते.
  • या मार्गदर्शक पुस्तिकेच्या रचनेमध्ये मूलभूत तत्त्वे (समुदाय-संचालित स्वरूप, सामुदायिक करार, आचारसंहिता, उद्दिष्टे), एका वर्षाच्या नियोजनापासून ते कार्यक्रम झाल्यानंतरच्या तीन महिन्यांपर्यंतच्या टप्प्यांचे वेळापत्रक, आणि यामागे असलेली व्यवस्था, संसाधने व टेम्पलेट्स स्पष्टपणे मांडण्यात आले होते.

या पोस्टची लिंक कॉपी करा https://climateweek.in/mr/blog/#post-march-2026

फेब्रुवारी २०२६: एक मत, द्वैवार्षिक कला महोत्सव, आणि ‘काय करू नये’ याचा घेतलेला धडा

वाचण्यासाठी क्लिक करा

  • कोची द्वैवार्षिक कला महोत्सवासोबत झालेल्या संवादामुळे देशातील एका सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध कला महोत्सवात क्लायमेट वीक इंडियाच्या उपस्थितीचा मार्ग मोकळा झाला. तसेच, इतर क्लायमेट वीक्स बद्दल झालेल्या मोकळ्या चर्चेतून क्लायमेट वीक इंडिया कसे नसायला हवे याचा एक अनपेक्षित धडा मिळाला.
  • या सर्व अनुभवांवरून एक गोष्ट स्पष्ट झाली: क्लायमेट वीक इंडियाचे स्वरूप हे पंचतारांकित आलिशान वातावरणात सजवलेले नसावे, तर ते हवामान बदलांशी जुळवून घेण्यावर आणि समुदायांच्या प्रत्यक्ष वस्तुस्थितीवर आधारित असावे.

या पोस्टची लिंक कॉपी करा https://climateweek.in/mr/blog/#post-february-2026

जानेवारी २०२६: अनेक आवाजांना एका मुख्य मागणीत बदलणे

वाचण्यासाठी क्लिक करा

  • हा महिना स्थानिक पातळीवरील विखुरलेल्या मागण्यांना प्रशासनापर्यंत पोहोचवता येईल अशा मजबूत आव्हानामध्ये बदलण्याचा होता. सोबतच इम्पॅक्ट रिपोर्ट, सदिच्छादूतांसाठी आवाहन आणि विविध प्रदेशांसाठी व्यावहारिक संसाधनांचे टूलकिट तयार करण्याचे कामही करण्यात आले.
  • २८ जानेवारी रोजी झालेल्या आढावा बैठकीत एक स्पष्ट उद्दिष्ट ठेवण्यात आले: क्लायमेट वीक इंडिया २०२५ दरम्यान समुदायांनी व्हिडिओवर नोंदवलेल्या ४५ गरजांमधून एक मुख्य मागणी तयार करणे, जी प्रशासनासमोर मांडता येईल.
  • सदिच्छादूतांची नावे निश्चित केली: पियाली, आशिष, वैष्णवी आणि जेफ.

या पोस्टची लिंक कॉपी करा https://climateweek.in/mr/blog/#post-january-2026

डिसेंबर २०२५: विस्तारत जाणाऱ्या कुटुंबासाठी अंतर्गत नियम

वाचण्यासाठी क्लिक करा

  • ३१ डिसेंबर रोजी झालेली आढावा बैठक ही सहयोगींच्या अंतर्गत संवादासाठी, विशेषतः व्हॉट्सॲपसाठी नियमावली तयार करण्यासाठी आणि या समूहाचा मुख्य उद्देश स्पष्ट करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
  • यासाठी एक सर्वसमावेशक रूपक वापरले गेले: हा मंच म्हणजे जाहिरातींचा फलक नसून, सर्वांचे अनुभव आणि ज्ञान एकत्र आणणारी एक पॉटलक (प्रत्येकाने काहीतरी योगदान देण्याची संकल्पना) आहे. ही एक अशी जागा आहे जी नेहमी स्नेहाने भरलेली, केंद्रित आणि औदार्याची असली पाहिजे.
  • या नियमांसोबतच नवीन वर्षाचा एक सोपा संदेश जोडण्यात आला, ज्याद्वारे सहयोगींना येत्या वर्षात या व्यासपीठाचा अधिक सक्रिय आणि फलदायी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

या पोस्टची लिंक कॉपी करा https://climateweek.in/mr/blog/#post-december-2025

नोव्हेंबर २०२५: प्रवास पुन्हा नव्याने मांडताना

वाचण्यासाठी क्लिक करा

  • टीमने एकापाठोपाठ एक अशा सर्व सहयोगींच्या चित्रकथा तयार केल्या. तसेच, इम्पॅक्ट रिपोर्ट केवळ तो तयार करणाऱ्या अँकर्सचा न वाटता संपूर्ण संघटनेचा वाटेल, यावर विचार करण्यासाठी मासिक बैठकीचा वापर केला. यावर असा मार्ग काढण्यात आला की, हा अहवाल असा असावा जो प्रत्येक सहयोगीला आपलासा वाटेल.
  • या नियोजनामागे एक तत्त्व सातत्याने होतं – सहयोगींना तयार अहवाल देण्याऐवजी, तो स्वतः तयार करता येईल असा नमुना द्यायचा.
  • संघटनेने आधीपासून आयोजित असलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष भेटींचं नियोजन केलं. यामध्ये ऑल्ट एफ, जस्टिसमेकर्स मेळा आणि सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल यांचा समावेश होता.

या पोस्टची लिंक कॉपी करा https://climateweek.in/mr/blog/#post-november-2025

ऑक्टोबर २०२५: एक खास आठवडा ते वर्षभर चालणारं नेटवर्क

वाचण्यासाठी क्लिक करा

  • संघटनेने दोन अशा गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित केले ज्यामुळे क्लायमेट वीक इंडिया हा ठरलेल्या तारखांच्या पलीकडेही टिकून राहील: पहिली गोष्ट म्हणजे दोन सत्रांच्या मधील काळात विविध प्रदेशांमध्ये काम चालू ठेवण्यासाठी सदिच्छादूत कार्यक्रम, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष काय घडले हे प्रामाणिकपणे मांडण्यासाठी दस्तऐवजीकरण आणि इम्पॅक्ट रिपोर्ट तयार करणे. या टप्प्यापासून दर आठवड्याला होणाऱ्या बैठकांऐवजी मासिक बैठका सुरू करण्यात आल्या.
  • टेरेजनरेशनच्या क्रितकाने गुणात्मक आणि संख्यात्मक दस्तऐवजीकरणाची जबाबदारी सांभाळली. मतदानातून डेटा तयार झाला, व्हिडिओ आणि छायाचित्रे सहयोगीनिहाय वर्गीकृत करून त्यांचे प्रतिलेखन करण्यात आले आणि त्यातून शिकण्यासारखे मुद्दे व विषयवार निरीक्षणे इम्पॅक्ट रिपोर्ट २०२५ साठी संकलित करण्यात आली.

या पोस्टची लिंक कॉपी करा https://climateweek.in/mr/blog/#post-october-2025

सप्टेंबर २०२५: प्रत्यक्ष क्लायमेट वीक आणि प्रामाणिक आढावा

वाचण्यासाठी क्लिक करा

  • ७ ते १४ सप्टेंबर दरम्यान देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एकदा काम सुरू झाल्यावर, बहुतांश सहयोगींना अँकर्सच्या मदतीची अजिबात गरज भासली नाही. आसाममधील कार्यक्रमाची उपस्थितांची संख्या जवळपास शंभरवर गेली. अल्ट एफ ने एकाच शुक्रवारी नऊ शहरांमध्ये चित्रपटांचे स्क्रिनिंग केले. ठिकठिकाणी भित्तिचित्रे साकारली गेली. त्यानंतर टीमने प्रामाणिकपणे दोन याद्या तयार केल्या – काय उत्तम झालं आणि मर्यादित संसाधनांमुळे काय नीट करता आलं नाही.
  • इम्पॅक्ट रिपोर्टनुसार, क्लायमेट वीक इंडिया २०२५ च्या अखेरीस १६ राज्यांमध्ये ९४ कार्यक्रम पार पडले, ३५ सहयोगी जोडले गेले आणि ८,५०० पेक्षा जास्त लोक यात सहभागी झाले.
  • प्रामाणिक मूल्यांकनाचा विचार करता, टीमने हे मान्य केले की कार्यक्रमापूर्वीची प्रसिद्धी आणि प्रचार घाईघाईत झाल्यासारखा वाटला. वारंवार आठवण करून देऊनही अनेक सहयोगींना दस्तऐवजीकरण प्रक्रियेविषयी स्पष्टता नव्हती. नावनोंदणी कमी झाल्यामुळे काही सहयोगींना आपले कार्यक्रम रद्द करावे लागले.
  • एक महत्त्वाचा रचनात्मक धडा : मर्यादित निधीमुळे वेबसाइटसाठी फक्त अर्धवेळ काम करणारा दूरस्थ वेब डिझायनर ठेवता आला. तो दिवसभर दुसऱ्या नोकरीनंतर रात्री साधारण ८ ते २ या वेळेतच उपलब्ध असे. ती फक्त उपलब्ध संसाधनांची मर्यादा होती, कोणाच्या कामावर टीका नाही; आणि यामुळे महत्त्वाच्या काळात वेबसाइट अपडेट होण्याचा वेग कमी झाला.
  • डेटा खूप वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेला होता. सहयोगींच्या मुख्य यादीमध्ये आणि मास्टर कॅलेंडरमध्ये ताळमेळ नसल्यामुळे, सहयोगींनी केलेले बदल वेबसाइट तयार करणाऱ्या व्यक्तीपर्यंत वेळेत पोहोचू शकले नाहीत. परिणामी ५ कार्यक्रम वेबसाइटवर प्रसिद्ध होऊ शकले नाहीत.
  • पुढच्या वर्षासाठीच्या सुधारणा आपोआप स्पष्ट झाल्या: अशी वेबसाइट जिथे सहयोगी स्वतःचे कार्यक्रम स्वतः अपलोड आणि मॅनेज करू शकतील, प्रत्येक संस्थेसाठी एकच संपर्क व्यक्ती असेल, व्हॉट्सॲपचे स्पष्ट नियम असतील, निधी उभारणी लवकर सुरू केली जाईल, आणि विविध प्रदेशांचे काम सांभाळण्यासाठी एक योग्य सदिच्छादूत व्यवस्था असेल.

या पोस्टची लिंक कॉपी करा https://climateweek.in/mr/blog/#post-september-2025

ऑगस्ट २०२५: भित्तिचित्रे, विनोदी कलाकार आणि प्रचंड प्रतिसाद

वाचण्यासाठी क्लिक करा

  • ऑगस्ट महिन्यात प्रतिसादाचा पूर आला: अतिशय वेगाने नावनोंदणीचे अर्ज आले, एक मीडिया टीम सोबत जोडली गेली आणि भूमी भाषा नावाच्या हवामानविषयक भित्तिचित्रांचा एक नवीन उपक्रम सुरू झाला. कार्यक्रमाला एक महिना शिल्लक असताना उपक्रमांचा नकाशा हरिद्वारपासून हॅवलॉकपर्यंत आणि मोरीगावपासून मुंबईपर्यंत पसरला होता. इंट्रो व्हिडिओने प्रथमच या उपक्रमाचं खरं स्वरूप स्पष्टपणे मांडलं.
  • भूमी भाषा या उपक्रमाची सुरुवात झाली. तमिळ, मल्याळम, कन्नड, मराठी आणि संस्कृत भाषांमध्ये “पृथ्वीची भाषा” असा अर्थ होणाऱ्या ५ हवामान भित्तिचित्रांची मालिका यात समाविष्ट होती.
  • २८ ऑगस्ट रोजी दिव्या आणि जेकब यांनी प्रास्ताविक मांडणारा व्हिडिओ शूट केला आणि आपल्या या प्रवासातील वाढ, संघटना आणि सहयोगींची कथा मांडली: दोन अँकर्स ज्यांनी सहयोगींना एकत्र आणले, आणि २०१९ मध्ये एका शहरापासून सुरू झालेला हा उपक्रम, आजच्या तारखेपर्यंत २२ ठिकाणं, ३५ सहयोगी आणि ५५ पेक्षा जास्त कार्यक्रमाच्या स्वरुपात कसा विस्तारला आहे, हे सांगितले.

या पोस्टची लिंक कॉपी करा https://climateweek.in/mr/blog/#post-august-2025

जुलै २०२५: यशाची व्याख्या नक्की काय आहे?

वाचण्यासाठी क्लिक करा

  • ११ जुलैच्या बैठकीत बेंगळुरूमध्ये संभाव्य कॉमेडी नाईट आयोजित करण्याबाबत एका व्हेन्यूशी चर्चा सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
  • १४ जुलै रोजी टीमने ब्रँडिंगच्या डिझाइन बद्दल आढावा घेतला आणि लागणाऱ्या सर्व साहित्याची यादी तयार केली.
  • २५ जुलैच्या अंतर्गत बैठकीत यशाच्या मुद्द्यावर थेट चर्चा झाली; ज्यामध्ये घेतलेली वचने, सहभागी संस्थांमधील विविधता, माध्यम प्रसिद्धी, तयार केलेले उपयुक्त अहवाल आणि निर्माण झालेल्या युती यांसारखी महत्त्वाची उद्दिष्टे (KPIs) निश्चित करण्यात आली.

या पोस्टची लिंक कॉपी करा https://climateweek.in/mr/blog/#post-july-2025

जून २०२५: उद्दिष्टे निश्चित करून पुढची वाट तयार करणे.

वाचण्यासाठी क्लिक करा

  • उद्दिष्टांनी एक कठीण पण महत्त्वाचे लक्ष्य ठेवले: सहभागींचा सामूहिक आवाज दर्शवणारा एक सह-निर्मित दस्तऐवज तयार करणे, जो जानेवारी २०२६ पर्यंत निर्णयकर्त्यांसमोर मांडला जाईल.
  • बंगळुरू क्रिएटिव्ह सर्कसने पहिली मुख्य तारीख निश्चित केली: ७ सप्टेंबर. या दिवशी त्यांचा ‘मार्केट डे’ कार्यक्रम होता, ज्याला त्यांनी हवामान ही थीम दिली, आणि या उपक्रमाचा शुभारंभ झाला!
  • २७ जूनच्या बैठकीत संघटनेने एक लिंक्डइन पेज तयार करण्याचे आणि सर्व संस्थांना स्वतःच्या कार्यक्रमाचे ग्राफिक्स स्वतः बनवण्याचे आवाहन करण्याचं निश्चित झालं. यामध्ये अँकर्स देखील त्यांना शक्य ती मदत करतील असं ठरवण्यात आलं.
  • कार्यपद्धतीचं असं वाटप ही आता निधीअभावी स्वीकारलेली तडजोड नव्हती. जूनपर्यंत ती क्लायमेट वीक इंडियाची स्वाभाविक कार्यपद्धती बनली होती.

आचारसंहिता वाचण्यासाठी इथे क्लिक करा →

या पोस्टची लिंक कॉपी करा https://climateweek.in/mr/blog/#post-june-2025

मे २०२५ : उत्तरांपेक्षा वेगाने कल्पना येत होत्या

वाचण्यासाठी क्लिक करा

  • हैय्याने कळवलं की ते क्लायमेट वीकसाठी स्वतंत्र अंतर्गत टीम तयार करत आहेत. या टीमचा भर हवामान न्याय आणि त्यांच्या समुदायातील सदस्यांच्या कामावर असेल.
  • ऑल्ट एफने दहा शहरांमध्ये असे फिल्म क्लब तयार करण्याचा प्रस्ताव दिला, ज्यात दर महिन्याला पाच लघुपट दाखवले जातील. टेरेजनरेशनने हेसरघट्टा आणि लालबाग (बेंगळुरू) येथे पक्षी आणि जैवविविधता निरीक्षण भ्रमंतीची संकल्पना मांडली. तसेच; बेंगळुरू, दिल्ली आणि गोव्यात स्पीड नेटवर्किंगची कल्पना मांडली.
  • मे महिन्यात समुदायाने मिळून क्लायमेट वीक इंडिया २०२५ ची सहा उद्दिष्टे तयार केली. यामध्ये स्थानिक हवामान उपायांना प्रोत्साहन देण्यापासून ते जानेवारी २०२६ पर्यंत प्रशासनासाठी सर्वसमावेशक अहवाल तयार करण्यापर्यंतच्या गोष्टींचा समावेश होता.
  • ३० मे रोजी समूहाने विविध भागीदारांच्या भूमिका स्पष्टपणे निश्चित केल्या : कोअर पार्टनर्स हे निर्णयप्रक्रियेतील सहयोगी, सॉलिडिटरी पार्टनर्स हे सहकारी (ज्यामध्ये प्रायोजक आणि स्थळांचाही समावेश असेल) आणि सहभागी म्हणजे वक्ते व उपस्थित प्रेक्षक. एक नियम मात्र स्पष्ट होता – प्रायोजक नेहमी सॉलिडिटरी पार्टनर्समध्येच राहतील.

क्लायमेट वीक इंडियाची उद्दिष्टे येथे पहा. →

या पोस्टची लिंक कॉपी करा https://climateweek.in/mr/blog/#post-may-2025

एप्रिल २०२५: सर्वांची उपस्थिती असलेली पहिली बैठक

वाचण्यासाठी क्लिक करा

  • ११ एप्रिलच्या प्रारंभिक बैठकीत काही मुख्य सहयोगी प्रथमच एकत्र आले.
  • जेकब यांनी मुख्य टीमसाठी नाव सुचवण्याचं आवाहन केलं. ‘हरियाली हीरोज’, ‘धरती डिफेंडर’, ‘जल ज्योती’, ‘डेलुलू डिस्पेलर्स’ आणि ‘हॉट मेस कलेक्टिव्ह’ अशी अनेक नावं पुढे आली; मात्र त्यापैकी एकही अंतिम ठरलं नाही.
  • दिव्याने सहयोगींसोबत सामुदायिक करार तयार करण्याची प्रक्रिया पार पाडली. हे करार पुढे वेबसाइटवर सार्वजनिकपणे प्रकाशित होतील, याबाबत सर्वांची सहमती होती.
  • सुरुवातीच्या कार्यक्रमांच्या कल्पना ठोस होत्या: बंगळुरू क्रिएटिव्ह सर्कसचा (BCC) स्क्रीनिंग आणि स्टॉल्सचा दिवस, ‘टेराकॉन्शस’ची चर्चासत्रे आणि व्हीआर (VR) अनुभव, ‘अननस’ची स्थानिक वनस्पतींची नर्सरी, इंदूरमध्ये ‘यूथ की आवाज’ची लेखन मालिका, TINEB ची स्वच्छता मोहीम आणि टेरेजनरेशनचे स्पीड नेटवर्किंग.
  • इथूनच साप्ताहिक कम्युनिटी कॉल्सची सुरुवात झाली – या नियमित संवादानेच पुढे संपूर्ण संघटनेला क्लायमेट वीकपर्यंत एकत्र बांधून ठेवलं.

सामुदायिक करार येथे वाचा. →

या पोस्टची लिंक कॉपी करा https://climateweek.in/mr/blog/#post-april-2025

जानेवारी ते मार्च २०२५ : संपर्कांची यादी आणि एक नवा शब्द

वाचण्यासाठी क्लिक करा

आम्ही आमच्या संपर्कांची यादी सतत चाळत होतो. दिव्या आणि मी (जेकब), मिळून अगदी प्रामाणिकपणे सहयोगींची निवड केली. ज्यांना आम्ही ओळखत होतो, आणि ज्यांना अगदी मध्यरात्री देखील फोन करू शकत होतो अशा लोकांपासून सुरुवात केली. नवीन संस्थांनी होकार तर दिलाच, पण त्यानंतर आणखी चांगली गोष्ट केली – त्यांनी इतर समविचारी लोकांनाही सोबत आणले. या काही आठवड्यांमध्येच एका महत्त्वाच्या गोष्टीची जाणीव झाली. सहयोगींना कार्यक्रमांचे आयोजन करायचे होते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटायचे होते. पण आम्ही जे करत होतो ते वेगळे होते. आम्ही सर्वांना एक-एक करून फोन करत होतो आणि एकत्र बांधून ठेवत होतो. एखादं असं गाव जे अजून वसलंच नाही, त्या गावाचे आम्ही सरपंच झालो होतो..

  • जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान आम्ही आमच्या ओळखीतील संस्थांना सातत्याने फोन करत राहिलो. आमचा निवडीचा निकष फक्त विश्वास आणि ओळख एवढाच होता. आम्ही अशा लोकांची निवड केली ज्यांच्याशी मतभेद झाले तरी आम्हाला संकोच वाटणार नाही.
  • नवीन सहयोगी सोबत जोडले गेले, ज्यामध्ये हैय्या (अक्षय, भूमिका आणि अंजली), बेअर नेसेसिटीज (सहर) आणि मुदितो (देविना) यांचा समावेश होता.
  • प्रत्येक जण इतर समविचारी लोकांना यात जोडत गेला. हे नेटवर्क एकमेकांच्या ओळखींतून आपोआप विस्तारत गेले.
  • आमची भूमिका ही सहयोगींपेक्षा वेगळी असेल, हे तर स्पष्ट झाले होते. त्यांना कार्यक्रमांचे आयोजन करायचे होते, धोरणकर्त्यांशी संवाद साधायचा होता आणि बैठकांना उपस्थित राहायचे होते. तर दिव्या आणि मी मिळून या सर्वांना एकाच छताखाली आणत होतो, आणि नंतर पुन्हा प्रत्येकाशी वैयक्तिक संपर्क साधत होतो. आमचं काम त्यांच्यापेक्षा वेगळं झालं होतं.
  • या वेगळ्या भूमिकेसाठी आम्हाला एक नवा शब्द हवा होता. म्हणून आम्ही स्वतःसाठी “अँकर” हा शब्द निवडला – कारण आमची भूमिका संघटनेला बदलत्या प्रवाहात, आर्थिक महत्त्वाकांक्षेत, वैयक्तिक प्रसिद्धीत किंवा कोणत्याही एका दिशेच्या अतिरेकी प्रभावात वाहून जाऊ न देता स्थिर ठेवण्याची होती. अगदी तसंच, जसं जहाजाचा नांगर (अँकर) त्याला स्थिर ठेवतो.
  • आम्ही सहयोगी संस्थांचे दोन प्रकार केले: कोअर पार्टनर्स, जे निर्णयप्रक्रिया आणि व्यवस्थापनात सहभागी असतात; आणि सॉलिडॅरिटी पार्टनर्स, म्हणजे स्थळे, प्रायोजक आणि इतर सहकार्य करणारे सहयोगी.
  • आम्ही सर्वांनी मिळून एक नियम ठरवला, जो आजही कायम आहे : देणगीदार किंवा प्रायोजक सहभागी झाले, तरी ते फक्त सॉलिडॅरिटी पार्टनर बनू शकतात – कोअर पार्टनर नाही. कारण पैसा या उपक्रमाला आधार देऊ शकतो; पण उपक्रमाची दिशा ठरवू शकत नाही.
  • आम्ही अजूनही या सगळ्याला २०१९च्या बंगळुरू क्लायमेट वीक सारखाच उपक्रम समजत होतो.. जो एका शहरापुरता मर्यादित होता. पण कामाचा आढावा काही वेगळंच सांगत होता..

जेकब चेरियन, अँकर, क्लायमेट वीक इंडिया

या पोस्टची लिंक कॉपी करा https://climateweek.in/mr/blog/#post-january-to-march-2025

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४: फोनवरचे दोन महिने

वाचण्यासाठी क्लिक करा

२०१९ मध्ये आम्ही क्लायमेट वीक बेंगळुरू आयोजित केला होता. सात दिवस आणि सात कार्यक्रम. त्या आठवड्यात एकत्र आलेले लोक त्यानंतर खऱ्या अर्थाने कधीच वेगळे झाले नाहीत. एका वर्षापूर्वी मी विचार करू लागलो की आपण हे पुन्हा करू शकतो का? प्लॅन खूप छोटा होता: गेल्या वेळेसारखाच फक्त बेंगळुरू शहरापुरता. ऑक्टोबरमध्ये मी मदतीसाठी UNFCCC कडून पाठिंब्याची विनंती केली, पण वेगवेगळ्या कारणांमुळे ते मदत करू शकले नाहीत. म्हणून मी थेट फोन उचलला. पुढील सुमारे दोन महिने फक्त मी, नावांची एक यादी आणि “तुम्हाला २०१९ आठवते का?” या प्रश्नाने सुरू होणारे अनेक फोन्स एवढेच सुरू होते.

  • ऑक्टोबर २०२४ मध्ये मी UNFCCC ला पाठिंब्यासाठी पत्र लिहिले. त्यांच्या स्वतःच्या आर्थिक मर्यादांमुळे त्यांचा नकार आला; आणि याच नकारातून खरंतर या सगळ्याची सुरूवात झाली.
  • पुढचे जवळपास दोन महिने मी स्वतः संभाव्य सहयोगींना फोन करत राहिलो. दिशा आणि मी मिळून एकेक नाव जोडत सहयोगींची यादी तयार केली.
  • मी ज्या संस्थांना फोन केले, त्या आधीपासूनच आमच्या परिचयाच्या होत्या: टेरेजनरेशन, बंगळुरू क्रिएटिव्ह सर्कस (मनिषा), से ट्रीज (कपिल शर्मा), झटका (दिव्या), अल्ट एफ्फ (कुणाल), टेराकॉन्शस (पूजा आणि तानिया), ग्रीनलेन (वरुण), इंडियन प्लॉगर्स आर्मी (प्लॉग राज), मिशन शून्य (गिरीश), FFF इंडिया (दिशा), TINEB (डीडी) आणि इतर काही संस्था.
  • ७ आणि १० नोव्हेंबर रोजी आम्ही अंतर्गत बैठक घेऊन आमच्या कल्पनेतील कार्यक्रमाचा संभाव्य खर्च काढला: मोठ्या परिषदेसारखा कार्यक्रम घ्यायचा असेल, तर एका शहरासाठी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि प्रत्येक अतिरिक्त शहरासाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च येऊ शकत होता. यात एका शहरात २१ ते २८ कार्यक्रम करण्याचे नियोजन होते. तसं पाहिलं तर हा खर्च खूप मोठा होता आणि तेवढा निधी आमच्याकडे आजिबात नव्हता. ही संपूर्ण संकल्पनाच जुन्या पद्धतीच्या परिषदेसारख्या कार्यक्रमाची होती.
  • नोव्हेंबरच्या बैठकांमधील कृती मुद्दे स्पष्ट होते: ७ नोव्हेंबरपर्यंत वेबसाइट खरेदी करणे. दिशा आणि मी क्लायमेट वीक २०२५ करार, लेटर ऑफ सपोर्ट आणि इतर संबंधित कागदपत्रांची पाहणी करू.
  • मी हा सगळा प्रस्ताव घेऊन अनेक देणगीदारांकडे गेलो, आणि सगळीकडून वारंवार नकार मिळत गेला. शेवटी आम्ही एक निर्णय घेतला – निधी मिळो वा ना मिळो, क्लायमेट वीक होणारच!
  • त्या एका निर्णयाने संपूर्ण उपक्रमाचं स्वरूप बदलायला सुरुवात केली. आर्थिक पाठबळ नसल्यामुळे, अनेकांच्या सहभागातून हा उपक्रम उभा करणं ही तडजोड राहिली नाही- तर तेच या उपक्रमाचं मूळ तत्त्व बनलं.
  • ७ डिसेंबरला मी, शगुन आणि स्वातीने मिळून क्लायमेट वीकचा संपूर्ण आराखडा पुन्हा एकदा पाहिला. क्लायमेट वीकपूर्वी दर महिन्याला एक छोटा पूर्व-कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरलं. त्याची सुरुवात XR डिझायनर्स आणि भारतीय हवामान समुदायातील डिझायनर्सच्या भेटीपासून करायची होती.
  • डिसेंबर २०२४ मध्ये दिव्या औपचारिकपणे या प्रवासात सहभागी झाली. तिने सहयोगासाठीचं पहिलं ‘लेटर ऑफ इंटेंट’ तयार करून पाठवलं.
  • त्यानंतर इतरांकडूनही लगेच होकार आले: बंगळुरू क्रिएटिव्ह सर्कस, टेराकॉन्शस, हैय्या, TINEB आणि अल्ट एफ. या पाच होकारांमुळे आता हा उपक्रम केवळ संकल्पना उरला नव्हता.

जेकब चेरियन, अँकर, क्लायमेट वीक इंडिया

या पोस्टची लिंक कॉपी करा https://climateweek.in/mr/blog/#post-october-to-december-2024